नवी दिल्ली - तेलंगणा राज्यातील असीफाबाद जिल्ह्यात वन विभागातील महिला वन अधिकारी अनीता यांना काठीने मारहाण करण्यात आली होती. यामध्ये अनिता गंभीर जखमी झाल्या होत्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याप्रकरणी टीआरएसच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप आहे. यावर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
काल (रविवार) सरसाला गावामध्ये राज्य सरकारच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी वन विभागाचे पथक पोहोचले होते. वन अधिकारी जेंव्हा जमीन समतळ करण्यासाठी पुढे सरसावले त्यावेळी कृष्णा राव आणि त्यांच्या समर्थकांनी अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱ्यांत आणि समर्थकांमध्ये भांडणे झाली. यादरम्यान, पथकाचे नेतृत्व करण्यासाठी वन अधिकारी अनीता ट्रॅक्टरवरती उभा राहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या टीआरएस कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, शेतकऱ्यांनी आणि समर्थकांनी अनिता यांच्यावर काठ्यांचा वर्षाव केला. दुसऱ्या अधिकाऱ्यांनी अनिता यांचा बचाव करण्यापूर्वी त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. यानंतर, त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले. याप्रकरणी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष कृष्णा राव आणि त्यांचे समर्थकांवर हत्येचा प्रयत्न, सरकारी वाहनाची तोडफोड आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य करण्यापासून रोखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यसभेत बोलताना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हटले, की वन अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीतील आरोपींवर आम्ही कठोर कारवाई करणार आहेत. या मुद्याला आम्ही याला गंभीररित्या घेतले असून अशा घटना आम्ही खपवून घेणार नाही. याप्रकरणी आम्ही कारवाई करण्यासाठी शक्य तेवढी मदत पुरवणार आहोत.
मारहाण झालेल्या वनअधिकारी सी. अनिता यांनी मारहाणीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की आम्ही जनतेचे सेवक आहोत. आम्ही कर्तव्य बजावत होतो. पक्षाने याप्रकरणी आमदाराविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. कारण, हा हल्ला माझ्यावर झाला नसून वर्दीवरती करण्यात आला आहे.