नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल येत्या १५ जुलैला जाहीर होणार आहेत. याबाबत महामंडळाकडून अधिकृत सूचना काढण्यात आली आहे.
कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या काही विषयांच्या रखडलेल्या परिक्षा या १ ते १५ जुलैदरम्यान आयोजित करण्याचा विचार सीबीएसई करत होते. त्यासाठी १८ मे रोजी सीबीएसईने रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. याविरोधात काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता, या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे मंडळाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या विषयांचे गुण वर्षभरातील एकूण कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, असे निर्देश देखील सीबीएसईला दिले. त्यानुसार उरलेले पेपर रद्द करून १५ जुलैला वैकल्पिक मुल्यांकनाच्या आधारावर निकाल घोषित करण्यात येणार आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी नंतर परीक्षेला बसण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जे विद्यार्थी या परीक्षेला बसतील त्यांचे त्या परीक्षामधील गुण अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जातील. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय नाही. मंडळाने दिलेले गुणच अंतिम निकाल म्हणून ग्राह्य धरला जाईल, असे परीक्षा नियंत्रक सन्याम भारद्वाज यांनी सांगितले.