नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला असून आज सकाळी सीबीआयच्या पथकाने एफआयआर नोंदवला. हाथरस बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. हाथरस घटनेचा तपास सीबीआयकडून व्हावा, अशी शिफारस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्राकडे केली होती. त्यानुसार तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
हाथरस जिल्ह्यात 14 सप्टेंबरला ही हृद्यद्रावक घटना घडली होती. पीडिता शेतात गेली असता गावातील चार सवर्ण तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. यावेळी पीडितेला मारहाण करत गंभीर जखमी केले होते. पीडितेच्या मानेला आणि मणक्याला गंभीर इजा झाली होती. तसेच तिची जीभही कापण्यात आली होती. दिल्लीत उपचार सुरू असताना 15 दिवसांनंतर पीडितेचा मृत्यू झाला होता.