कोलकाता - शारदा चीट फंड घोटाळ्यात दोषी ठरवले गेलेले कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत केला जात असून सीबीआयने मांडलेल्या प्रस्तावानुसार ही नोटीस जारी करण्यात आली.
लुक आऊट नोटीस जारी केल्यानंतर व्यक्तीला देश सोडून जाण्यास मज्जाव केला जातो. ही नोटीस जारी केल्याने राजीव कुमार यांना आता पुढील एक वर्ष देशाबाहेर जाता येणार नाही. तरीही त्यांनी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तर इमीग्रेशन अधिकारी त्यांना अटक करून सीबीआयच्या ताब्यात देतील.
शारदा चीट फंड घोटाळ्यात आरोपी राजीव कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर कुमार यांनी दुय्यम न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली. मात्र, दुय्यम न्यायालयानेही त्यांना अभय दिले नाही.
राजीव कुमार हे शारदा चीट फंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहेत. काही नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांनी असे केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने वरिष्ठ न्यायलयात याचिका दाखल करून कुमार यांच्या अटकेची परवानगी मिळवली होती.
सीबीआयने राजीव कुमार यांच्या घरी छापे टाकण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, कोलकाता पोलिसांनी विरोध केल्यामुळे सीबीआयला त्यांच्या घरात प्रवेश करता आला नाही. यावेळी पोलीस आणि सीबीआय यांच्यात धक्काबुक्की झाल्याचीही बातमी आली होती. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राजीव कुमार यांच्या बचावार्थ मैदानात उतरल्या होत्या. त्यासाठी त्यांनी धरणे आंदोलनही केले होते.