हैदराबाद - 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या लोकांना कोविड-19 चा विशेष धोका आहे. तरुण असताना त्यांची रोगप्रतिकारकशक्ती जेवढी मजबूत होती, तेवढी आता नाही; याशिवाय, या वयोगटातील लोकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदय आणि फुफ्फुसांचे आजार अधिक प्रमाणात आढळून येतात. परिणामी, गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका अधिक वाढीस लागतो.
ज्येष्ठ नागरिकांवर कोविड-19 चा भयंकर परिणाम होतो आणि काहीवेळा हा परिणाम जीवघेणा ठरु शकतो, असे विविध देशांमधील अभ्यासातून समोर आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनी त्यांची सुश्रुषा करताना, बाथरुमच्या वापरानंतर, स्वयंपाकानंतर आणि या सर्व गोष्टी करण्यापुर्वीदेखील वारंवार किमान 20 सेकंदासाठी हात धुणे किंवा मद्यार्कयुक्त सॅनिटायझरने हातांची स्वच्छता करणे यासारखे महत्त्वाच्या उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे, सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तींनी खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर किंवा कोपराचा वापर करण्याची सुचविण्यात आलेली पद्धत वापरणे आवश्यक आहे. घरांमध्ये ज्या जागी वारंवार हात लावला जातो त्या जागेची साबण आणि पाणी किंवा जंतुनाशकांचा वापर करुन स्वच्छता करावी.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय उपकरणाचा समावेश आहे. हालचाल कमी झाल्याने, ज्येष्ठ नागरिकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क कमी असतो. त्यांचा मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी आणि त्यांच्यातील उत्साह कायम राहण्यासाठी सामाजिक संवाद आवश्यक आहे.
परंतु, मित्र किंवा नातेवाईकांच्या भेटीमुळे आजारी पडण्याचा धोका असल्याने वैयक्तिक स्वरुपाच्या भेटींचे प्रमाण कमी ठेवायला हवे. मित्र आणि नातेवाईकांबरोबर संवाद साधणे महत्त्वाचे आहे. मात्र, फोन कॉलच्या माध्यमातूनदेखील ही गोष्ट करता येणे शक्य आहे.
शेजारी, घरातील नोकर, पोस्टमन आणि इतरांबरोबरील संभाषणामुळे सामाजिक दुराव्याची (सोशल आयसोलेशन) भावना कमी होण्यास आणि बाहेरच्या जगाचा वृत्तांत मिळण्यास मदत होईल.
ज्येष्ठांना लहान मुलांबरोबर संवाद साधायला आवडते, कारण त्यांच्या खेळकर आणि उत्साही वृत्तीमुळे संपुर्ण वातावरण आनंदी होते. परंतु, ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, लहान मुले कोविड-19 च्या परिणामांविरोधात लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते आणि पारंपरिकरित्या वृद्धांबरोबर असलेल्या जवळीकीमुळे ही मुले वृद्धांपर्यंत विषाणू वाहून नेऊ शकतात.
अशा परिस्थितीत, लहान मुलांना वृद्धांपासून एक ते दोन मीटरचे अंतर राखण्यास सांगणे आवश्यक आहे. जर लहान मुले आजारी असतील, तर संपुर्ण बरे होईपर्यंत त्यांना लांब ठेवण्यात यावे.
व्हिडिओची सुविधा असणारे कॉम्प्युटर्स आणि फोनसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आपले मित्र आणि कुटुंबियांबरोबर संपर्कात राहू शकतात. ज्यांना कमी ऐकू येण्याची समस्या आहे, अशा व्यक्तींसाठी संवाद सुलभ होण्यासाठी विशेष अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, घरातील इतर कुटुंबीय मित्र आणि नातेवाईकांना त्यांच्या (ज्येष्ठ नागरिकांच्या) तब्येतीची चौकशी करण्यासाठी संदेश पाठविणे, पत्र लिहीणे तसेच वारंवार फोन करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात.
त्याचप्रमाणे, धार्मिक आणि अध्यात्मिक उपासना केंद्रे बंद आहेत, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अध्यात्माच्या संपर्कात राहण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करणे आवश्यक आहे. यामध्ये ऑनलाईन सत्रे, दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि संस्थेतील इतर सदस्यांबरोबर फोन कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा समावेश आहे.
हलके व्यायाम करणे, श्वसनाचे व्यायाम, ध्यानधारणा आणि घरात प्रार्थना करणे हे अध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ राहण्याचे मार्ग आहेत. मनोरंजनासाठी ज्येष्ठ नागरिक दूरचित्रवाणी पाहतात, परंतु सातत्याने कोविड-19 संदर्भातील बातम्यांचा मारा होऊन अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे दूरचित्रवाणी बघण्यावर बंधने घालायला हवीत.
मोठ्या स्तरावरील कौटुंबिक संवादासाठी ही विशेष संधी आहे जिथे ज्येष्ठ नागरिक आपल्या अनुभवांची माहिती देऊ शकतात. त्याचप्रमाणे, फॅमिली अल्बम तयार करण्याच्या प्रक्रियेत किंवा स्वयंपाकात मदत आणि सल्ला देऊन स्वतःला गुंतवून ठेऊ शकतात.
जेव्हा आजारी पडण्याची शक्यता असते, तेव्हा वैद्यकीय मदत मिळवण्याची योजना असणे महत्वाचे आहे. सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तींनी सध्या सुरु असलेली आणि सेवा पुरविण्यास उपलब्ध असलेली स्थानिक चिकित्सालये, रुग्णालये आणि फार्मसीजची माहिती करुन घ्यावी. औषधे आणि आवश्यक साहित्याचा साठा करणे तसेच 2-3 महिन्यांसाठी ते पुरतील याची खात्री करुन घ्यावी.
जर सुश्रुषा करणारी व्यक्ती आजारी पडली तर मित्र किंवा नातेवाईक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून काम करु शकतात. उदाहणार्थ, माझ्या 92 वर्षांच्या आईच्या हालचालीवर मर्यादा आणि तीव्र आजाराची समस्या आहे. परंतु, ती स्वयंपाकात मदत करणे, कौटुंबिक प्रश्नांमध्ये सल्ला देणे आणि तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगून आमचे मनोरंजन यासारख्या गोष्टींमधून स्वतःला सक्रिय ठेवते.
आम्ही घरातील पौगंडावस्थेतील मुलांपासून तिला लांब ठेवतो. परंतु, या मुलांना गाणं गाण्यासाठी, मजेदार गोष्टी सांगण्यासाठी आणि कॅरमसारखे खेळ खेळण्यास प्रोत्साहन देतो. यामुळे शारिरीक अंतर राखले जाते परंतु माझ्या आईचे मनोरंजनदेखील होते.
लॉकडाऊन आणि दीर्घकालीन भौतिक दुराव्यामुळे कोविड-19 चा तणाव विशेष जाणवत आहे. हा भौतिक दुरावा सामाजिक दुरावा होता कामा नये आणि ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या कुटुंबांनी यावर मात करण्यासाठी अभिनव आणि सर्जनशील पद्धती शोधून काढणे आवश्यक आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्वातंत्र्याची भावना कायम राहील तसेच या संकटकाळात ते शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यास मदत होईल.
(हा लेख डॉ. व्ही. रमण धारा, एमडी, प्राध्यापक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ - हैदराबाद यांनी लिहीला आहे.)