नवी दिल्ली - चीन- भारत सीमा वाद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात स्वदेशीचे वारे वाहू लागले आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी सर्व स्तरांवरून होत आहे. दरम्यान, ‘द कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (CAIT) या संघटनेकडून ‘इंडियन गुड्स आवर प्राईड’ हे अभियान सुरु केले आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
डिसेंबर 2021 पर्यंत 1 लाख कोटी रुपयांची चीनी आयात कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सीएआयटीने 3 हजार वस्तूंची यादी तयार केली आहे, ज्या वस्तू आत्ता चीनमधून आयात केल्या जातात, मात्र, ही उत्पादने भारतात सहज तयार केली जाऊ शकतात. यामध्ये तयार वस्तू, कच्चा माल, स्पेअर पार्टस आणि तंत्रज्ञानावर आधारित वस्तू आहेत.
चीनकडून तयार वस्तू आयात करण्यात बहिष्कार टाकण्याचा निर्णय सीएआयटीने घेतला आहे. व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्समध्ये फेस मास्क आणि रेल्वेत पाणी आणि चहा पिण्याच्या ग्लासचे अनावरण करण्यात आले. या अभियानाचा उद्देश मास्क आणि ग्लासवर छापण्यात आला आहे.
डिसेंबर 2020 पर्यंत विविध रेल्वे गाड्यांध्ये 5 कोटी ग्लास वाटण्यात येणार आहेत. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी भारतीया आणि राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत देशातील अनेक आघाडीचे व्यावसायिकही सहभागी झाले होते. आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या मोदींच्या आवाहानाला प्रतिसाद देण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असल्याचे मत सीएआयटीने मांडले.