नारायणपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) जवान नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडीच्या स्फोटात जखमी झाला आहे. ही घटना नारायणपूर जिल्ह्यात घडली आहे. जखमी जवानाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने रायपूरमध्ये नेण्यात येणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार आयईडीचा स्फोट ओर्छ्छा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारी तीन वाजता घडला आहे. हे ठिकाण छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून 350 किमी आहे. त्या ठिकाणी सशस्त्र दलाचे जवान हे गस्त घालत असताना अचानक स्फोट झाला होता.
नारायणपूरचे पोलीस अधिकारी मोहित गर्ग म्हणाले, की गस्त घालणारे जवान हे धानोरा आणि ओर्छ्छा जंगलातील परिसरात पोहोचले. त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडील रिमोटचे बटन दाबून आईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तरात सुरक्षा बलाने गोळीबार केल्यानंतर नक्षलवादी पळून गेले. सीएफ 16 या बटालियनचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल छेलक हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी कोम्बिंग मोहिम सुरू असल्याचे गर्ग यांनी सांगितले.