नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडित बोनस (प्रॉडक्टिव्हिटी-लिंक्ड बोनस) देण्यास मंजुरी दिली आहे. याचा ११ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार, ७८ दिवसांचे वेतन बोनस म्हणून मिळणार आहे.
हा बोनस कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेचे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे मंत्री जावडेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा उघड.. पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्याचे मिळाले ताजे पुरावे
या बोनसमुळे सरकारी तिजोरीवर २ हजार २४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. सलग ६ व्या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडित बोनस देण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री जावडेकर यांनी दिली.
उत्पादकतेशी निगडित बोनस म्हणजे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची पोचपावती आहे. यामुळे रेल्वेची विविध कामे अधिक कार्यक्षमतेने होऊ शकतील, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
सध्या मंजूर झालेला बोनस नॉन-गॅझेटेड (विना-राजपत्रित) रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. यामध्ये रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) आणि रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (आरपीएसएफ) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - ई-सिगारेटवर बंदी, उल्लंघन केल्यास तुरुंगवास अन् दंडाची तरतूद