चंदीगड - नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधातील आंदोलनाचे लोण हरियाणा राज्यामध्येही पसरले आहे. राज्यातील नूह जिल्ह्यामध्ये आंदोलक वादग्रस्त कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नूह जिल्ह्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इतर जिल्ह्यातील २ पोलीस अधिक्षकांना पाचारण केले आहे. एकून सहा पोलीस अधिक्षक आंदोलनावर नजर ठेवून आहेत. तर २ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे.
कायदा हातात घेतल्यावर सक्त ताकीद
यासंबधी माहिती देण्यासाठी नूह जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अनिल कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर सक्त कारवाई करण्यात येईल. यासोबतच पोलीस सोशल मिडियावर नजर ठेऊन असणार आहेत. आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. पोलिसांची आंदोलकांवर नजर असेल. जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी पोलीस सज्ज आहेत, असे कुमार यांनी सांगितले.