पणजी - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासोबतच गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकाही आज पार पडल्या. यामध्ये मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या तीन विधानसभा मतदार संघासाठी ही पोटनिवडणुक झाली. यामध्ये भाजप आणि महाराष्ट्र गोमंतक पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होती.
शिरोडा मतदार संघामध्ये मगो आणि भाजपमध्ये सरळ टक्कर होती. तर, मांद्रे येथे काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत पाहण्यास मिळाली. भाजपने मगो नेते सुदिन ढवळीकर यांची सरकारमधून हकालपट्टी केली होती. त्यामुळे शिरोडा मतदार संघाची लढत ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. यावेळीही सुदिन ढवळीकर मगोच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणारे सुभाष शिरोडकर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळेच ही जागा रिकामी झाली होती.
दोन्ही पक्षांना आपल्या विजयाची पूर्ण खात्री आहे. भाजपच्या अपप्रचाराचा फायदा मागोला होणार, अशी त्यांना आशा आहे. प्रमोद सावंत यांनी महिलांचा अपमान केल्यामुळे जागृत महिला भाजपला मतदान करणार नाहीत, अशी अपेक्षाही ते बाळगून आहेत.
भाजपचे राज्याध्यक्ष विनय तेंडूलकर यांची संपूर्ण गोव्याभर ख्याती आहे. त्यामुळे जनतेला माहित आहे की त्यांना मतदान कोणाला करायचे. त्यामुळे भाजपला मताधिक्य भेटेल, अशी अपेक्षा भाजपला आहे.