कोणे एकेकाळी, शिक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट हे ज्ञानदान हे होते. पण आज, नोकरी मिळवण्याचे ते एक साधन झाले आहे. रोजगारक्षमतेशिवाय शिक्षणाकडे तुच्छतेने पाहिले जाते. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण धोरणाने 2020 (एनईपी 2020) कामावर आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. गेल्या काही दशकांमध्ये, व्यवसाय क्षेत्राने सर्वोच्च प्रमाणात रोजगार निर्माण केले आहेत. खरेतर, व्यापार हाच आज जगावर राज्य करतो आहे.
ऑनलाईन रिटेल, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन लेखा(टॅली), करसंकलन आणि वित्तीय तंत्रज्ञान यांनी व्यावसायिक क्षेत्राला बदलून टाकले आहे. बहुसंख्य रोजगाराच्या संधी या वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी आज वाणिज्य अभ्यासक्रमांसाठी नावनोंदणी करत आहेत. 40 ते 50 टक्के पदवी शिक्षण घेणारे बी. कॉम. ची निवड करत आहेत.
गेल्या पाच वर्षांत, अनेक विशेष प्रकारची शिक्षण देणारी वाणिज्य महाविद्यालये उदयास आली आहेत. परंतु भारतात, विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा लेखापरिक्षण कौशल्ये शिकण्यासाठी उच्च माध्यमिक किंवा इंटरपर्यंत वाट पहावी लागते. ज्यांनी इंटर म्हणजे बारावीला सीईसीचा अभ्यास करून बी कॉम पदवी प्राप्त केली आहे. त्यांनाच वाणिज्य शाखेचे आकलन होते. याचा अर्थ असा की, जोपर्यंत विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत त्यांना या असंख्य रोजगार संधींचा लाभ घेता येत नाही. ही स्थिती बदललीच पाहिजे.
बदलत्या काळानुसार, अभ्यासक्रमही बदलला पाहिजे. शाळांनीही आपल्या अभ्यासक्रमांमध्ये वाणिज्य शाखेच्या मूलभूत तत्वांचा अंतर्भाव केला पाहिजे. आतापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्याला माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण करेपर्यंत सहा विषय सक्तीने शिकावा लागतो. केवळ इंटरमध्येच, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडता येतो. सध्याचा शालेय अभ्यासक्रम हा केवळ जे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र, भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र घेणाऱया विद्यार्थ्यांनाच लाभदायक आहे.
वाणिज्य हा अभ्यासक्रमाचा भाग नसल्याने, सीईसी घेणाऱ्यांचे यात नुकसान होत असल्याचे दिसते. एनईपी 2020 ने 10 अधिक 2 या शालेय व्यवस्थेला बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांना आता नवव्या इयत्तेपासून पुढे वाणिज्यचा विषय म्हणून समावेश करावा लागणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना लेखा आणि वाणिज्यच्या मूलभूत तत्वांचे ज्ञान होणार असल्याने, ते पदवी अभ्यासक्रम अधिक विचारपूर्वक निवडू शकतील.
महात्मा गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देईल, असे शिक्षण दिले जावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. वाणिज्य जर शाळेतच लहान वयात शिकवले गेले तर, मुलांना आपल्या व्यावसायिक कौशल्याला अधिक धार लावता येईल. आपल्या देशाला रोजगार मागणाऱ्यांपेक्षा अधिक रोजगार निर्माण करणारे हवे आहेत.
सध्याच्या घडीला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना इतरांपेक्षा जास्त संधी उपलब्ध आहेत. स्वयंरोजगार हे वाणिज्य अभ्यासक्रमाचे आणखी एक आगळे वैशिष्ट्य आहे. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हा ऑडिटर, सल्लागार, लेखापरिक्षक, शेअर बाजार विश्लेषक किंवा मर्चंट बँकर अशी अनेक कामे निवडू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये कारकिर्दीच्या या मार्गांचे आकलन विकसित झाले तर, तो किंवा ती आपल्या भविष्याचे नियोजन करू शकतात. केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीयच नव्हे; विद्यार्थ्यांकडे बेसुमार पर्याय असतील.
डिजीटल युगाने विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती आणि विचारप्रक्रियेत बदल घडवून आणला आहे. आजचा 15 वर्षाचा विद्यार्थी हा 25 वर्षे वयाच्या युवकाइतका प्रगल्भ असतो. त्यामुळे, समाजशास्त्र आणि गणित या बरोबरच वाणिज्यचाही समावेश विषय म्हणून करणे अत्यंत अर्थपूर्ण आहे. केवळ वाणिज्य या विषयाचा शाळेत समावेश करण्यापुरता हा बदल मर्यादित असू नये. संवाद आणि जीवनकौशल्ये हा ही अभ्यासक्रमाचा भाग असला पाहिजे. याद्वारे, विद्यार्थी रोजगारक्षमतेची कौशल्ये आत्मसात करण्याबरोबरच आपली ज्ञानाची तहानही भागवू शकतील. सुरूवातीपासूनच योग्य मार्गदर्शन मिळाल्याने, ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात यशस्वी होऊ शकतील. एनईपी 2020 चा हाच तर उद्देष्य आहे.