कानपूर - बहूजन समाजवादी पक्षाचे नेते पिंटू सेनगर यांची जमिनीच्या वादातून अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कानपूर शहरातील चकेरी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली.
आज (शनिवार) दुपारी 2.30 वाजता चकेरी भागात ही घटना घडली, असे चकेरी प्रभागाचे सहाय्य्क पोलीस अधिक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले. दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी सेनगर यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला, असे कुमार म्हणाले.
गोळीबारानंतर सेनगर यांना कानपूर शहरातील रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना पडकण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असून पूर्वनियोजितपणे हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
या घटनेनंतर चकेरी भागामध्ये तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रस्ता बंद करत आंदोलन सुरू केले आहे.