कोलकाता : ईद-अल-झुआच्या पार्श्वभूमीवर भारतातून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांची तस्करी केली जाते. याला आळा घालण्यासाठी दक्षिण बंगालमधील बीएसएफ जवानांनी सीमेवरील पहारा कडक केला आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
या अधिकाऱ्याने सांगितले, की बांगलादेशमध्ये 'कॅटल हाट'ना परवाना देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. या 'कॅटल हाट'मध्ये जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. यामधील बहुतांश जनावरे ही भारतातून तस्करी करुन नेण्यात आलेली असतात. मागील वर्षभरापासून आम्ही चोख पहारा ठेवल्यामुळे या तस्करीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, तरीही आम्ही खबरदारी बाळगणार आहे.
यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचीही मदत घेत आहोत. नाईट कॅमेरा ट्रॅक्टर्स, आणि स्पीड बोटींच्या मदतीने आम्ही सीमाभागावर लक्ष ठेऊन आहोत. यासोबतच, मालदा आणि बहरामपूर भागातील नीम तीटा, हारुदंगा, मदनघाट, सोवापूर याठिकाणी तैनात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना हाय अलर्ट देण्यात आला आहे असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
बीएसएफने स्थानिक पोलिसांच्या मदतीने घाटांमध्ये तात्पुरते कॅम्प उभारले आहेत. या घाटांमधूनच मोठ्या प्रमाणात गुरांची तस्करी केली जाते, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा : 'गुन्ह्यांची आकडेवारी लपवण्याचं सोडून मुख्यमंत्री योगींनी दुसरं केलंय तरी काय?'