लंडन - हृदय हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. हृदयक्रिया बंद पडली तर आयुष्याच्या इतिसमाप्तीशिवाय पर्याय राहत नाही. काही अत्यंत अवघड शस्त्रक्रियांमध्ये काही काळासाठी हृदयक्रिया थांबवली जाते. नंतर ती पुन्हा सुरू केली जाते. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान किंवा एखाद्या अपघातामुळे किंवा आजारपणामुळे मर्यादेपेक्षा अधिक काळ हृदयक्रिया बंद राहिल्यास ती पुन्हा सुरू करणे कठीण किंवा अशक्य बनते. अशा स्थितीत रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. मात्र, ब्रिटनमध्ये चमत्कार म्हणावा अशी घटना घडली आहे. एका ब्रिटिश महिलेचे हृदय तब्बल सहा तास बंद पडले होते. ते पुन्हा सुरू करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यामुळे या महिलेला नवसंजीवनी मिळाली आहे.
ऑड्री मार्श असे या अत्यंत नशीबवान महिलेचे नाव आहे. ही महिला ३ नोव्हेंबरला स्पॅनिश पायरेनीज येथे तिच्या पतींसोबत हायकिंगला गेली होती. हे दोघे बर्फाच्या वादळात सापडले. त्यामुळे अतिथंडीमुळे गंभीररित्या तिच्या शरीराचे तापमान कमी (hypothermia) झाले होते.
तिची प्रकृती अत्यंत बिघडली होती. ती बेशुद्ध झाली होती. कोणतीही हालचाल नसल्याने तिचा मृत्यू झाला आहे, असा तिच्या पतींचा समज झाला. त्यांना त्या परिस्थितीतून सोडवण्यासाठी बचाव पथक तब्बल ६ तासांनंतर पोहोचले. तिला बार्सिलोना येथील वॉल डी हेब्रॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती जीवंत असल्याची लक्षणे दिसत नव्हती.
हेही वाचा - तो अतिक्रूरपणा का, बलात्कारी इतके क्रूर का असतात? मानसोपचारतज्ञांचे विश्लेषण
हिमशिखरांवरील अत्यंत थंड वातावरणामुळेच तिचा जीव वाचण्यास मदत झाली, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तिला हायपोथर्मिया (Hypothermia) झाल्यामुळे म्हणजेच शरीराचे तापमन अत्यंत कमी झाल्यामुळे बेशुद्धावस्थेत तिच्या शरीराचे, त्यातील अवयवांचे संरक्षण झाले. तसेच, मेंदू मृत होण्यापासूनही संरक्षण झाले असे डॉक्टरांनी म्हटले आहे. या थंड तापमानानेच तिला मृत्यूच्या दाढेतून परत आणले.
मात्र, वैद्यकीय मदतीनंतर तिला पुन्हा जीवनदान मिळाले. तिचा हृदयक्रिया बंद पडण्याचा काळ स्पेनमध्ये सर्वाधिक नोंद झाला आहे.