लंडन - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. आत्तापर्यंत जगभरामध्ये जवळ जवळ ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये तर चीनच्या वुहान प्रांतापेक्षाही बिकट परिस्थिती झाली आहे. एका दिवसात ३०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत साडेसहा हजार नागरिकांना लागण झाली असून ११२ जण दगावले आहेत. तर इंग्लडमध्ये १ हजार ९५० जणांना कोरोनाची लागण झाली असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इंग्लमधील अभ्यासकांचा धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यामुळे तेथील सरकारने कडक निर्बंध जारी केले आहे.
कोरोना विषाणूमुळे अमेरिका आणि इंग्लडमध्ये लाखो जणांचा मृत्यू होणार असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. नील फर्ग्युसन हे लंडनमधील इंपिरीयल कॉलेजमध्ये मॅथॅमॅटिकल बायोलॉजी या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. त्यानुसार, अमेरिकेत कोरोनामुळे २२ तर इग्लंडमध्ये ५ लाख कोरोनामुळे दगावणार असल्याचे म्हटले आहे. इटलीमधील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या अभ्यासानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी सोमवारी आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. लोकांच्या सार्वजनिक जीवनावर बंधने घालण्यात आली आहेत. येत्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी होण्याचे चिन्ह नसल्याचा अंदाज फर्ग्युसन यांच्या टीमने काढला आहे. कोरोनाच्या प्रसारानंतर सरकारने संशयित रुग्णांना अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, नागरिकांवर बाहेर पडण्यासंबधी कडक निर्बंध लागू केले नाहीत. त्यामुळे त्याचा अधिक गंभीर परीणाम होण्याची शक्यता आहे.
कडक सामाजिक निर्बंध जसे की, क्लब, पब आणि चित्रपटगृहांमध्ये नागरिकांना जाण्यास बंधने घालावी. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी करता येईल. कोरोना संसर्गामुळे आर्थिक परिस्थितीवर आणि एकंदर समाजावर मोठा परिणाम होणार असल्याचे इंपिरीयल कॉलेजमध्ये संसर्गजन्य आजारांचा अभ्यास करणारे प्राध्यापक अझरा घनी यांनी सांगितले.