मंगळुरू (कर्नाटक) : यक्षगान हे कर्नाटकमधील एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. या माध्यमातून अनेक पौराणिक कथांचे विविध वेशभुषेसह सादरीकरण केले जाते. ही कला आधी फक्त पुरुष सादर करायचे मात्र, हळूहळू यात महिलांचा सहभागही वाढू लागला आहे. यातच जात धर्माच्या सीमा ओलांडत एका तरुणीने मुस्लीम समाजातील प्रथम महिला 'यक्षगान कलाकार' होण्याचा मान प्राप्त केला आहे.
रामायण, महाभारतातील अनेक हिंदू पौराणिक कथेतील पात्र या माध्यमातून साकारले जातात. मात्र, दक्षिण कन्नडच्या ओकेथूरमधील अर्शियाने धर्म, जातीच्या पल्याड जाऊन या कलेची आवड जोपासली. महिषासुराच्या भूमिकेसाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. पुरुष वेशभुषेतील महिषासुराचे पात्र साकारताना एखाद्या पुरुष यक्षगान कलाकाराला हेवा वाटावा अशी तिची भूमिका असते. तिचे हावभाव, मुद्रा आणि शब्दांची रचना इतकी सुरेख असते प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातात.
अर्शियाने लहानपणी देवी महात्म हे नाटक पाहिले होते. यामध्ये महिषासुराच्या भूमिकेने तिचे विशेष लक्ष वेधले आणि आपणही अशाप्रकारचे एखादे पात्र साकारावे, असे तिने ठरवले. मात्र, त्यावेळी ते शक्य झाले नाही. मात्र, तिने आवड जोपासत दूरदर्शनमधून यक्षगान बघत त्यातील नृत्यकला शिकण्यास सुरुवात केली. हळूहळू तिची आवड वाढत गेली. शिक्षण आणि लग्नांतरही या कलेबाबत तिचं प्रेम कमी झालं नाही. नंतर, थिएटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्शियाचं नातं या कलेशी आणखी घट्ट होत गेलं. तिनं काबली कलाकेंद्रात प्रवेश घेतला. तिथे असलेल्या रमेश भट्ट यांच्याकडून तिला या कलेचे प्रशिक्षण मिळाले आणि येथून तिची यक्षगान कलाकाराच्या रुपाने सुरुवात झाली.
अर्शिया मुस्लीम समाजातील पहिली महिला यक्षगान कलाकार आहे. तिची आवड जोपासण्यासाठी तिच्या आई-वडिलांसह मित्र-मैत्रिणींनीही तिला वेळोवेळी सहाय्य केले. सध्या एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करते आणि यक्षगानचे प्रयोगदेखील करते. आई-वडिलांचा पाठिंबा आणि मेहनतीच्या जोरावरच आपलं स्वप्न साकार करू शकल्याचे ती सांगते.