पटना - उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जाळून मारल्याची घटना ताजी असताना बिहारमधूनही धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेतिया जिल्ह्यातील नरकटियागंज येथे एका गर्भवती तरुणीला तिच्या प्रियकराने रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणी ७० टक्के भाजली आहे.
तरुणीवर बेतिया मेडिकल कॉलेजमध्ये प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र, गंभीर भाजली असल्याने तिला पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र, तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. साथीदारांच्या मदतीने तरुणीच्या घरात घुसून आरोपीने प्रियसीला पेटवून दिले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. तसेच तरुणी एक महिन्याची गर्भवती असल्याने तिने प्रियकराकडे लग्नाची मागणी केली. मात्र, लग्न करण्यास आरोपीने नकार दिला होता. मंगळवारी घरामध्ये कोणी नसताना आरोपीने तरुणीला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नताशा गुडिया यांनी दिली.