नवी दिल्ली - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शाळा भरवण्यात येत आहेत. ऑनलाइन शिक्षण उपक्रम चांगला असला, तरी यापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहत आहेत. तेलंगणाच्या जगतियाल जिल्ह्यातील कोदीमियाल येथे एका मुलाने ऑनलाइन क्लासेससाठी पालकांनी मोबाईल न घेऊन दिल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रघू प्रसाद असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
रघू प्रसाद हा नवव्या वर्गात शिक्षण घेत होता. रघु प्रसादने ऑनलाईन क्लासेससाठी पालकांना फोन खरेदी करण्यासाठी सांगितले. तेव्हा पालकांनी त्याला दसरा उत्सवात फोन खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. तोपर्यत रघू एक साधा पर्यायी फोनवर आपले काम चालवत होता. मात्र, दसऱ्याच्यावळी पालक त्याला मोबाईल घेऊन देऊ शकले नाही. मात्र, त्यांनी आपण कापूस विकल्यावर फोन घेऊ, असे रघूला सांगितले. यावरून निराश झालेल्या रघुने घरी कोणीच नसताना आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्रातही घडली होती अशी घटना -
यापूर्वी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याच्या नैराश्येतून दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. कोरोना काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.