नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत चीन नियंत्रण रेषेवर मागील चार महिन्यांपासून जो वाद सुरू आहे, तो चीनच्या धोरणाचा परिपाक असल्याचा आरोप आज(गुरुवार) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. चीनने एकतर्फी सीमेवरील 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अशी परिस्थिती उद्धभवली, असेही मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे. २९/३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पँगाँग लेक परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव अधिकृत वक्तव्य जारी करताना म्हणाले की, भारत सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यास कटीबद्ध आहे. पुढचा मार्ग वाटाघाटीचा आहे. हे स्पष्ट आहे की, मागील चार महिन्यांत सीमेवर जी परिस्थिती झाली आहे, त्याला चीनची एकतर्फीपणे 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न कारणीभूत आहे.
सीमेवरील तणाव पूर्णपणे कमी करण्यासाठी आम्ही चीनला विनंती करतो की, त्यांनी भारताबरोबर चर्चा करावी. तणाव कमी करणे, हा त्यामागील उद्देश हवा, असे श्रीवास्तव म्हणाले. चीनने सीमेवर आक्रमक लष्करी हालचाली केल्याचा आरोप सोमवारी भारताने केला होता.
नियंत्रण रेषेवर भारताने गस्तही वाढवली आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम येथील भारत चीन सीमेवर जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८० तुकड्या उत्तराखंड आणि सिक्कीम राज्यातील नियंत्रण रेषेवर पाठविण्यात आल्या आहेत.