नवी दिल्ली - देशभरात कालपासून (4 मे) लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये मद्यविक्रीसह तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वाईन शॉप्स आणि पान टपऱ्यांवर मंदिरांप्रमाणे रांगा लागल्या आहेत. गेल्या चाळीस दिवसांपासून तहानेने व्याकूळ झालेल्या तळीरामांना अखेर दिलासा मिळाल्याचे चित्र होते. मात्र, आता दिल्ली सरकारने यासंबंधी नवीन निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दारूविक्रीवर थेट ७० टक्के अतिरिक्त कर लावला आहे. हा कर कमाल विक्री किंमतीवर आकारण्यात येणार आहे. यामुळे पिण्याची हौस भागवणाऱ्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
या निर्णयानंतर कोरोनामुळे बुडलेला महसूल तसेच आर्थिक नुकसान भरून निघणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.