लखनौ - हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी लखनौ पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. ज्या हॉटेलमध्ये आरोपी थांबले होते. त्या हॉटेलची माहिती लखनौ पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून भगव्या रंगाचे कुर्ते आणि एका पिशवीहीसह चाकू जप्त केला आहे.
कैसरबाग पोलीस ठाण्याअंतर्गत लालबाग येथील खालसा इन हॉटेलमध्ये दोन संशयित व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथे आरोपींनी खोली भाड्याने घेतल्याचे समोर आले. हॉटेलचे रजिस्टर आणि आयडी पाहिला असता, संशयिताचे नाव शेख अशफाक हुसेन तर दुसर्या व्यक्तीचे नाव पठाण मोइनुद्दीन अहमद असे आहे. दोन्ही संशयितांचा पत्ता सूरत (गुजरात) आहे.
17 ऑक्टोबर रोजी रात्री 11:08 वाजता हॉटेल रूम नंबर जी 113 मध्ये दोन्ही मारेकरी थांबले होते. 18 ऑक्टोबर रोजी दोघेही 10:38 वाजता बाहेर गेले आणि नंतर पुन्हा 01:21 वाजता परत आले. यानंतर दोघांनीही दुपारी 1:37 वाजता हॉटेल सोडले. दरम्यान पोलिसांना हॉटेलच्या खोलीतील कपाटातून लोअर बॅग, लाल रंगाचा कुर्ता तर पलंगावर भगवा रंगाचा कुर्ता आणि कमलेश तिवारी यांचा खून करताना वापरलेला चाकू आढळला आहे. याचबरोबर खोलीत जिओ मोबाइल फोनचा एक नवीन बॉक्स, चष्मा बॉक्स इत्यादी वस्तू सापडल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावले.