भिंड - देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे रक्तपुरवठा केंद्रांना तुटवडा भासत आहे. रुग्णालयात रक्तपेढीमध्ये रक्तासाठा कमी झाला आहे. सोशल डिस्टन्सच्या नियमामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन रद्द झाले आहे. त्यामुळे भिंडमध्ये रक्तपुरवठ्याचे प्रमाण कमी झाले आहे.
भिंडमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्याचे प्रमाण चांगले होते. मात्र, आता लॉकडाऊन असल्यामुळे रक्त मिळवण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील ब्लडबँकचे प्रभारी डॉक्टर देवेश शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की ब्लडबँकांमध्ये १०० ते १२५ युनिट साठा राहत होता. मात्र, आता रक्तदान शिबिर आयोजित होत नसल्याने रक्तसाठा कमी झाला आहे. रक्तदान न झाल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत फक्त ८ युनिट रक्तसाठा उपलब्ध आहे.
भिंडचे खासदार संजीव कुशवाहा यांनी सांगितले, की लॉकडाऊन दरम्यान गरजुंना रक्तसाठा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. यासाठी सावधगिरी बाळगून रक्तदान करण्यासाठी दाते येऊ शकतात, असेही ते म्हणाले.
सामाजिक संस्थांद्वारे मदतीचा हात -
गरजवंतांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था मदतीचा हात घेऊन पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्यामार्फत रक्तपुरवठा करण्याची मदत देखील होत आहे. भिंड जिल्ह्यात सध्या संजीवनी रक्तदान गट तसेच नवजीवन मदत केंद्र या दोन संस्था रक्तदान कार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.