नवी दिल्ली - काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे नेत्यांना थेट प्रचार करणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून भाजपने व्हर्च्युअल प्रचाराला सुरुवात करत आहे. गृहमंत्री अमित शाह बिहारसाठी आज एक व्हर्च्युअल रॅली घेणार आहेत. या आभासी(व्हर्च्युअल) रॅलीसाठी भाजपने सर्व तयारी केली आहे.
बिहारनंतर येत्या ८ जूनला पश्चिम बंगालसाठीसुद्धा शाह अशीच रॅली घेणार आहेत. याव्यतिरिक्त ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी भाजपचे काही प्रमुख नेते व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील मध्य प्रदेश पोट निवडणुकीसाठी प्रचार रॅली घेणार आहेत.
आजच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपच्या दिल्ली मुख्यालयात एक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्यावरून शाह जनतेला संबोधित करतील. तर असेच एक व्यासपीठ बिहारमध्ये उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी बिहार भाजपचे नेते या रॅलीत सहभागी होतील. याच प्रकारची तयारी पश्चिम बंगालसाठीही करण्यात आली आहे.
शाह यांच्या आजच्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोक जोडले जावेत यासाठी भाजपचा जोरदार प्रयत्न आहे. शाह यांच्या थेट प्रक्षेपणाची लिंक व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे. टीव्ही चॅनल्सवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.