श्रीनगर - काश्मिरात तीन भाजपा कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दक्षिण काश्मिरातील कुलगाम जिल्ह्यात ही घटना घडली. जिल्ह्यातील काझीगुंड येथील वाय. के पोरा भागात आज (गुरुवार) सायंकाळी गोळीबार झाला. द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
काझीगुंड भागातील घटना
फिदा हुसेन इट्टो, उमर हज्जाम आणि उमर रशीद बेग अशी गोळीबारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत. यातील फिदा हुसेन हा कुलगाम जिल्ह्याचा भाजपा युवा मोर्चाचा सचिव होता. तिघांनाही मृतावस्थेत काझीगुंड येथील रुग्णालयात आणण्यात आले, असे डॉ. असीमा नाझीर म्हणाल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
स्मशानभूमी भरून जाईल -
लष्कर ए- तोयबा दहशतवादी संघटनेची उपशाखा समजल्या जाणाऱ्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीआरएफ संघटनने सोशल मीडियावर एक संदेश जारी केला आहे. यात म्हटले आहे की, ' स्मशानभूमी संपूर्ण भरून जाईल'. जून महिन्यापासून दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला सुरू केला आहे. आत्तापर्यंत आठ कार्यकर्त्यांना ठार मारण्यात आले आहे.