जयपूर - देशात कोरोना संसर्गाची भीती असताना भाजपकडून व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात येत आहेत. राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित व्हर्च्युअल रॅलीत सहभागी झालेल्या तीन भाजप कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत भाजपच्या अनेक नेत्यांनीही सहभाग घेतला होता.
भाजपच्या उदयपूर विभागाने या व्हर्च्युअल रॅलीची तयारी केली होती. 27 जूनला पक्षाच्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. अनेक बडे नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. राजस्थानातील विरोधी पक्षनेते गुलाब चंद कटारीया, वरिष्ठ भाजप नेते शांती लाल छपलोट, आमदार फुल सिंग मिना आणि इतरही अनेक नेते या रॅलीत सहभागी होते.
कोरोना झालेल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. कोरोना काळातही रॅली आयोजित केल्याने कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपच्या या व्हर्च्युअल रॅली प्रकाश झोतात आल्या आहेत.