नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारणा केली होती, असे विधान केले होते. यावरुन विरोधकांनी आज राज्यसभेत गोंधळ घातला आहे. राहुल गांधींनी यावरुन नरेंद्र मोदींकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
विरोधकांनी घातलेल्या गोंधळावर भाजप प्रवक्ते सुदेश वर्मा यांनी ईटीव्ही भारतसोबत चर्चा केली. वर्मा म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प विवादास्पद टिप्पणी करण्यासाठी त्यांच्या देशात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधानांची अमेरिकेत खिल्ली उडवली जाते. अमेरिकेतील एका वृत्तपत्रात याबाबत एक अहवाल आला आहे. यानुसार, ट्रम्प आतापर्यंत ८ हजारपेक्षा जास्त वेळेस खोटे बोलले आहेत. राहुल गांधींनी शशी थरुर यांच्याकडून शिकले पाहिजे. पंतप्रधान खोटे कशामुळे बोलतील. पंतप्रधानांनी कधी आणि कोठे उत्तर द्यायचे, हा त्यांचा निर्णय आहे.
काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. यामध्ये इतर कोणाचाही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. या समस्येला लाहोर डिक्लेरेशन आणि शिमला समजोत्यानुसार सोडवले पाहिजे, अशी भाजपची भूमिका राहिली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही हा मुद्दा द्विपक्षीय असून यावर विवाद करणे गरजेचे नाही, असे म्हटले आहे. अशी प्रतिक्रिया सुदेश वर्मा यांनी दिली आहे.