नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आज कोलकाता येथे भाजप युवा मोर्चाने कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी मोर्चाला नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज केला. या घटनेचा विरोध करताना भाजपचे महासचिवांनी मुख्यमंत्री ममतांवर टीका करताना म्हटले आहे, की ममतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
अरुण सिंह म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये लोकसभेचे निकाल आल्यापासून ममतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्या बिथरलेल्या आहेत. ममता भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या घडवून आणत आहेत. त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहेत. तृणमूलचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत. आम्ही याचा विरोध करायला गेलो तर मोर्चावरही लाठीचार्ज केला जात आहे. बंगालमध्ये कायदा नावाची गोष्ट उरलीच नाही. पोलीस आणि सरकारी व्यवस्था ममतांचे समर्थन करत आहेत.
ममतांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही लोकशाही आहे. यामध्ये उत्तर पक्ष नाही तर जनता देते. वेळ आल्यावर जनता त्यांना निश्चितच उत्तर देईल. फक्त लाठीचार्ज आणि भाजप कार्यकर्त्यांची हत्या केल्याने सत्ता मिळेल, असा त्यांचा गैरसमज आहे. बंगालमधील लोकांना लोकशाही पाहिजे. येथील जनता ममतांच्या सरकारमुळे त्रस्त आहे, असेही अरुण सिंह म्हणाले.