नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलून मोदी नरेंद्र विद्यापीठ असे नाव करा, अशी मागणी उत्तर-पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी केली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अभाविपद्वारा आयोजित 'एक शाम शहीदों के नाम' या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, आपल्या पूर्वजांच्या चुकीमुळे आजपर्यंत जम्मू-कश्मीरमधील कलम ३७० हे आपल्यासाठी डोकेदुखी ठरले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कलम हटवून हे त्रास दूर केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून देशात आनंदाची लाट आणली आहे. अशावेळी विद्यापीठाला मोदींचे नाव द्यायला हवे. ज्या पूर्वजांच्या चुकीमुळे भारतने इतके वर्ष शिक्षा भोगले त्यांचे नाव काढून मोदी नरेंद्र विद्यापीठ असे नाव विद्यापीठाला द्यायला हवे, असे ते यावेळी म्हणाले.
हंसराज हंस यांच्या विधानास राजकीय मुद्दा बनवू नये -
यासंदर्भात कार्यक्रमास उपस्थित भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांना विचारले असता त्यांनी हंसराज हंस यांच्या विधानास राजकीय मुद्दा बनविण्यास नकार दिला.
ते म्हणाले, हंसराज हंस यांनी उत्साहात हे विधान म्हटले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच जम्मू-कश्मीरमध्ये ३७० हे कलम लागू करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे विधान करणे स्वाभाविक होते. परंतु, यामध्ये कोणताही राजकीय वाद निर्माण करण्याचा त्यांचा हेतू नाही.
या कार्यक्रमास भोजपुरी कलाकार दिनेश लाल यादव निरहुआ, अभाविपचे सहसंगठन मंत्री श्रीनिवाल, डुसू अध्यक्ष शक्ती सिंह आणि जेएनयूचे विद्यार्थी उपस्थित होते.