भांगर (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी खळबळजनक आरोप केला आहे. जर भाजपाला निवडणूक जिंकता आली नाही तर ते 'मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट रचू शकतात', असा आरोप सुब्रत मुखर्जी यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांना नुकसान करण्याचा प्रयत्न कराल तर...-
बंगालचे पंचायत मंत्री मुखर्जी म्हणाले, भाजपा जर कोट्यावधी नागरिकांची आई, ममता बॅनर्जी यांना नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही त्यांना असे करण्यापासून रोखू. बंगालमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी बाहेरील लोकांना आणले जात आहे. आम्ही त्यांची योजना यशस्वी होऊ देणार नाही. मुखर्जी शनिवारी दक्षिण 24 परगणा येथे रस्ता उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
मुखर्जी यांच्या आरोपावर भाजपची प्रतिक्रिया-
दरम्यान, मुखर्जी यांच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, "सतत कमी होत चाललेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे तृणमूल कॉंग्रेसचे नेते असे आरोप करीत आहेत."
भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून 'नौटंकी'-
यापूर्वी जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, अपेक्षित लोक भाजपाच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र येत नाहीत. म्हणूनच भाजप आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून 'नौटंकी' करत आहे.
जेपी नड्डा यांच्या ताफ्यातील कारवर दगडफेक-
जेपी नड्डा यांच्या ताफ्यात सामील झालेल्या कारवर दगडफेक करण्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात केंद्र सरकारने कडक वृत्ती दर्शवत राज्यातील तीन उच्च अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर बोलविले आहे. राज्यपाल धनकर यांनी अनेक वेळा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दलही गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यपाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात थेट संघर्षही बर्याच वेळा पाहिला गेला आहे.
हेही वाचा- आजपासून हिवाळी अधिवेशन; 6 अध्यादेश, 10 विधेयके मांडणार - मुख्यमंत्री
हेही वाचा- वांशिक नरसंहार म्हणजे काय? जगातील वंशहत्येच्या मोठ्या घटना