नवी दिल्ली - राज्यातील साखर उद्योग अडचणीत आहेत. त्यामुळे साखर उद्योगांना न्याय मिळावा. लघु-सूक्ष्म उद्योगांप्रमाणे साखर उद्योगालाही पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. आज फडणवीस दिल्लीमध्ये शाहांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये साखर उद्योगाबाबत चर्चा झाली.
साखर उद्योगांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या पक्षातील काही लोकांनी लक्षात आणून दिले आहे. केंद्रात आमचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही ही मागणी घेऊन केंद्राकडे गेलो. यावेळी इथेनॉलच्या पॉलिसीमध्ये बदल करण्यासंबंधी सूचवले. तसेच साखरेचे उत्पादन जास्त झाले, की भाव पडतात. तसेच एमएसपी वाढवायला पाहिजे. त्यामुळे साखर कारखान्यांना मदत होईल, असे गृहमंत्र्यांना सांगितले. त्यावेळी चांगले निर्णय घेणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
कुठलीही राजकीय चर्चा नाही -
फडणवीसांसोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे सुद्धा उपस्थित होते. हे सर्व नव्याने भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते आहेत. त्यामुळे काही राजकीय चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला असता, ही कुठलीही राजकीय चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या सर्व नेत्यांना साखर उद्योगाचे ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना सोबत आणले असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
राज्यातील कोरोना परिस्थितीची दिली माहिती -
महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या राज्यात काय परिस्थिती आहे? याबाबत गृहमंत्र्यांना माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडून जी मदत करत येईल, त्याबाबत देखील त्यांनी आश्वासन दिल्याचे फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, फडणवीसांची केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार अशी चर्चा होती. याबाबत त्यांना विचारले असता, अद्याप भाजपाची कार्यकारीणी तयार झाली नाही. त्यावर कोणाला घ्यायचं, कोणाला नाही याबाबत चर्चा होईल. वरिष्ठ नेते निर्णय घेतील. अद्याप कुठल्याही समितीत निवड झाली नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.