नवी दिल्ली - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय जनता दलावर (आरजेडी) टीका केली. नोकरी हिसकावणारे लोक, आता सत्तेत येण्यासाठी नोकरी देण्याविषयी बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली. बिहारच्या औरंगाबादमध्ये निवडणूक सभेला ते संबोधित करत होते.
पूर्वी बिहारमध्ये निवडणुकीच्या वेळी, जाती, धर्म, समाजात फूट पाडण्याच्या चर्चा होत. मात्र, आता भाजप विकासाची चर्चा करतो. नरेंद्र मोदी आल्यावर त्यांनी राजकारणाचे चित्र बदलले आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. देशात एकही पीपीई किट बनविण्यात आलेली नव्हती, परंतु आज भारत इतर देशांना पीपीई किटचा पुरवठा करत आहे. तसेच आज देशात तीन लाखाहून अधिक व्हेंटिलेटर आहेत, असे नड्डा म्हणाले.
एनडीए सरकारने 18 हजार गावांमध्ये वीज पोहचवली -
राजदने बिहारमध्ये अराजकता निर्माण केली. बिहारमधील लोक राज्य सोडून गेले. पूर्वी फक्त दिवसातून 2 तास वीज असायची. मात्र, आता तशी स्थिती राहिली नाही. मोदींनी 1 हजार दिवसात जवळपास 18 हजार गावांमध्ये वीज पोहचवली आहे. बिहारमध्ये 66 लाख लोकांच्या घरात वीज पोहचली आहे. मार्च महिन्यापासून मोदींनी दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो गहू, तांदूळ आणि प्रतिकुटुंबाला एक किलो डाळ दिली आहे, असे नड्डा यांनी सांगितले. कोरोनाचे संक्रमण झाले. तेव्हा आपल्याकडे फक्त एकच चाचणी प्रयोगशाळा होती. मात्र, आता 1600 प्रयोग शाळा आहेत. सुरुवातील 1500 कोरोना चाचण्या व्हायच्या. तर आता दरदिवशी 15 लाख कोरोना चाचण्या होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.