नवी दिल्ली - काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी हवाई हल्ल्यावर शंका उपस्थित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला आहे. विरोधी पक्षांनी भारतीय वायु दलाचा पुन्हा अपमान केला आहे. भारतीयांनो त्यांच्या अशा वक्तव्यावर आपण त्यांना प्रश्न विचारा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. तर भाजप अध्यक्ष अमित शहांनीही पित्रोदांच्या प्रश्नांवर आक्षेप नोंदवला आहे. मोदींच्या या पवित्र्यांनतर देशात मात्र राजकीय वाद पेटण्याची शक्यता तयार झाली आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. विरोधी पक्ष केंद्रातील भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाजपही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस घोषणापत्र समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांनी प्रश्न विचारल्यानंतर भाजपला उत्तर देण्यास भाग पडावे लागले आहे. त्यासाठी चक्क मोदींनी जनतेला आवाहन केले.
देश सेनेच्या पाठीशी उभा - मोदी
देशवासीयांनो त्यांना सांगा (काँग्रेसला) १३० कोटी भारतीय जनता सैन्याच्या विरोधात उचललेल्या प्रश्नांसाठी त्यांना (काँग्रेसला) माफ करणार नाही. संपूर्ण देश भारतीय वायु सेनेच्या पाठिशी उभा आहे, अशा शब्दात मोदींनी जनतेला ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केले आहे. तर त्यांच्या उत्तरानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पित्रोदाच्या या प्रश्नाचा फायदा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जनतेला आवाहन केले आहे.
काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करा - शाह
विरोधी पक्ष आणि भाजपमधील अंतर आता स्पष्ट झाले आहे. त्यांना (काँग्रेसला) आपल्या लष्करावर संशय आहे. तर, भाजपला आपल्या सैन्यावर गर्व आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके दहशतवाद्यांसाठी आहेत. तर भाजपचे देशाच्या तिरंग्यासाठी. या निवडणुकांमध्ये तुमच्या मतदानाच्या शक्तिने काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करा, अशा शब्दात अमित शाह यांनी जनतेला आवाहन केले आहे.