नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारताने कोरोनाच्या संकटाशी लढत असताना जगातील अनेक देशांना मदत देखील केली आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी मोदींना पत्र लिहिले असून कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचं आणि मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
कोरोनाविरोधातील लढाईत सरकारने योग्य वेळी आवश्यक पावले उचलली आहेत. भारतामधील कोरोनाच प्रसार कमी करण्यासाठी सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली योग्य निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक आरोग्यामध्ये संतुलन साधण्याचा आणि सामाजिक संरक्षण सुनिश्चित करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे बिल गेट्स यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
भारत सरकारने लोकांना आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी सेतु अॅप लाँच केले आहे. मला आनंद आहे की, भारत सरकार डिजिटल क्षमतांचा पूर्ण वापर करीत आहे. तसेच कोरोना हॉटस्पॉट, लॉकडाऊन आणि साथीविरोधात लढण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्णय कौतुकास्पद आहेत, असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
भारताने कोरोना संकटात सार्कच्या सदस्य देशांना मदत केली आहे. तसेच अमेरिका, ब्राझील आणि इस्त्राईलसह अनेक देशांमध्ये औषधे पाठविली. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने आपल्या लष्करी आरोग्य कर्मचाऱ्यांना कुवैत आणि मालदीव येथे पाठविले आहे. तसेच भारताने अफगाणिस्तानमध्ये अन्न टंचाई निर्माण होऊ नये म्हणून गव्हाची मदत केली आहे. त्यानंतर आता पुन्हा वैद्यकीय मदत देऊ केली आहे. मित्र देशांना शक्य तेवढी मदत करण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.