मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात अॅक्युट इन्सेफऍॅलिटीस सिंड्रोम (एईएस) या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत १०० हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. 'बनावट औषधे पुरवण्यात येत आहेत. यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवली आहे,' असे आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांचीही नावे आहेत. या प्रकरणाची सुनावणी २६ जून रोजी होणार आहे. अॅड. पंकज यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी रुग्णालयातून रुग्णांना प्रिस्क्राईब (पुरवली जाणारी, चिठी लिहून दिली जाणारी) केली जाणारी औषधे तपासावीत, अशी मागणी केली आहे. याशिवाय, केंद्रीय आणि राज्याच्या प्रयोगशाळांमध्ये त्या औषधांचे परीक्षण केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
या आजाराने एवढे गंभीर रूप धारण केलेले असताना मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल १८ दिवसांनी भेट देण्यास पोहोचल्याने त्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. हॉस्पिटलमध्ये मेंदूज्वराने आजारी मुलांवर नीट उपचार करण्यात येत नाहीत. तसेच, बनावट औषधे पुरवण्यात येत आहेत. रोज मुलांचा मृत्यू होत आहे. नितीश कुमार यांना आता जाग आली आहे. त्यांनी परत जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णाच्या एका नातेवाईकाने दिली. यापूर्वी विरोधकांनीही त्यांना लक्ष्य केले होते. तसेच काळे झेंडे दाखवत 'ले जाव' नारे दिले गेले.