नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांनी जागावाटप केले असून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे काँग्रेसकडून आज आपल्या स्टार प्रचारकांची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शत्रुघ्न सिन्हा आणि इतर काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. यांच्या नावांची यादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांशी महागठबंधन केले आहे. जागावाटप झाले असून राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 आणि डावे पक्ष 29 जागांवर लढणार आहेत. तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार असून यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे.
तथापि, बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.