नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 18 हजार 653 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या 507 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाखाच्या जवळ पोहचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 85 हजार 493 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 20 हजार 114 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 47 हजार 979 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 17 हजार 400 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 7 हजार 855 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 74 हजार 761 वर गेली आहे. यातील एकूण 75 हजार 995 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 90 हजार 911 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
नवी दिल्लीमध्ये 87 हजार 360 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 742 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 58 हजार 348 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच 26 हजार 270 जणांवर उपाचार सुरू आहेत.
तसेच गुजरात राज्यात 32 हजार 557 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 846 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 7 हजार 49 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 23 हजार 662 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तामिळनाडूमध्ये 90 हजार 167 कोरोनाबाधित तर 1 हजार 201 जणांचा बळी गेला आहे. तर 38 हजार 892 रुग्ण सक्रिय आहेत आणि 50 हजार 74 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान भारतातील कोरोनाची पहिली लस तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. 'कोव्हॅक्सिन' असे या औषधाचे नाव आहे. भारत बायोटेक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयएमसीआर), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी संयुक्तपणे या लसीचे संशोधन केले आहे. सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा नमुना एनआयव्हीमधून भारत बायोटेकमध्ये आणण्यात आला होता, त्यानंतर त्यावर संशोधन करुन ही लस तयार करण्यात आली आहे.