नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघटनेच्या नेतृत्त्वाखाली हजारो शेतकरी आज दिल्लीमध्ये आले होते. मात्र, १५ मागण्यांपैकी ५ मागण्या मान्य केल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथून या मोर्चाला सुरुवात झाली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलांना दिल्ली शहरात प्रवेश करण्यापासून रोखले. तसेच दिल्ली पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
भारतीय किसान संघटनेचे ११ सदस्य दिल्ली प्रशासनासोबत कृषी मंत्रालयामध्ये मागण्यांचे पत्र देण्यास गेले होते. शेतकऱ्यांच्या एकून १५ मागण्या होत्या त्यातील ५ मागण्या मान्य करण्यात आल्याने आंदोलन मागे घेतले आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीमध्ये चक्का जाम करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. तसेच किसान घाट येथेही शेतकरी ठिय्या आंदोलन करणार होते.
नोयडाजवळ शेतकरी येताच पोलिसांनी त्यांना अडवले होते. दिल्ली गेटवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. उस पिकाचे थकित बिल, विजेचे वाढते दर अशा समस्या शेतकऱ्यांनी सरकार दरबारी मांडल्या.
दिल्ली मेरठ एक्सप्रेसवर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाचे पालीस तैनात करण्यात आल होते. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होवू नये यासाठी अनेक वाहतूक मार्ग बदलण्यात आले होते.