नवी दिल्ली - महात्मा गांधींना 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने आपण सरकारला असे कोणतेही निर्देश देणार नसल्याचे स्पष्ट केले.
याबाबत निकाल देताना, महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता आहेत. हा मान कोणत्याही नागरी पुरस्कारापेक्षा उच्च असल्याचे निरिक्षण यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोंदवले.
बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने हा निर्णय दिला. या खंडपीठामध्ये बोबडेंव्यतिरिक्त न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश होता. हा निर्णय देताना त्यांनी याचिकाकर्त्याला सांगितले, की याप्रकरणी याचिकाकर्त्याची सर्व मते न्यायालयाला मान्य आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्याने स्वतः सरकारकडे याबाबत निवेदन द्यावे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी भारतीय असल्याचे पुरावे द्या; 'या' व्यक्तीने आरटीआयमार्फत मागितली माहिती