बंगळुरु - कर्नाटकची राजधानी बंगळुरु शहराच्या पूर्व भागात मंगळवारी (११ ऑगस्ट) दंगल झाली. काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने फेसबुकवरून द्वेष पसरवणारी पोस्ट शेअर केल्यानंतर ही दंगल पेटली होती. जमावाच्या हल्ल्यात दोन पोलीस ठाण्यांचे आणि काँग्रेस आमदाराच्या घराचे नुकसान झाले. तसेच अनेक गाड्याही पेटवून देण्यात आल्या. आज(शुक्रवार) काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या पी. नवीन याने द्वेष पसरवणारी पोस्ट टाकल्याचे कबूल केले आहे.
दंगलीनंतर पोलिसांनी पी. नवीनला १२ ऑगस्टला ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्याने फेसबुक खाते हॅक झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र, आता त्याने भडकाऊ आणि द्वेष पसरवणारी पोस्ट फेसबुकवर टाकल्याचे मान्य केले आहे. पूर्व बंगळुरु विभागाचे पोलीस उपायुक्त एस. डी. शरनप्पा यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
'पी नवीन(२६) हा काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या आहे. तपासासाठी नवीनला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याने शेअर केलेली पोस्ट भडकाऊ असल्याने जमाव भडकला. जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस ठाणे आणि मूर्ती यांच्या घराचे नुकसान झाले', असे शरनप्पा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
'नवीन विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक करण्यास उशीर केला. त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळेच जमाव भडकला. जमावाच्या हल्ल्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले, असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर तत्काळ कारवाई केली असती तर हिंसाचार झाला नसता', असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून ६ गुन्हे दाखल केले आहेत. तर २०० पेक्षा जास्त व्यक्तींना अटक केली आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस नगरसेविकेचा पती कलीम पाशा यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दंगलीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल, असे राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.