बंगळुरू - आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शहरातील फोर्टिस रुग्णालयाने रुग्णांची तपासणी करण्यासाठी रोबोट तैनात केले आहेत. रुग्णांच्या सतत संपर्कात आल्याने कोरोनाची लागण डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झाल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे, त्यामुळे रुग्णालयाने रोबोट वापरण्यास सुरुवात केली आहे.
डॉक्टारांना मदत करण्यासाठी 'मित्र' नावाचा रोबोट रुग्णांच्या प्राथमिक तपासणीसाठी वापरण्यात येत आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा रोबोट ठेवण्यात आला आहे. आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान हा रोबोट तपासतो. तसेच इतर प्रश्न विचारून रुग्णाची प्राथमिक माहिती घेतो. त्यानुसार रुग्णाला आत येण्यासाठी पास देता. जर एखाद्याला ताप असेल तर त्याची माहिती डॉक्टरांना मिळते. त्यानुसार त्या व्यक्तीची तपासणी करण्यात येते.
दिल्लीतील एम्स रुग्णालयानेदेखील निर्जंतुकीकरणासाठी आणि रुग्णांच्या निगराणीसाठी रोबोट ठेवले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या रुममध्ये सफाई करण्यासाठीही देशात रोबोट वापरण्यात येत आहेत.