कोलकाता(पश्चिम बंगाल)- लॉकडाऊन काळात कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनामध्ये वाढ झाल्याची माहिती पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या अध्यक्षा लीना गंगोपाध्याय यांनी दिली आहे. नेहमी महिलांना कौटुंबिक हिसांचाराला तोंड द्यावे लागते मात्र लॉकडाऊनमध्ये या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे त्या म्हणाल्या.
एप्रिल महिन्यात महिलांना वाढत्या कौटुंबिक हिसेंच्या घटनांना सामोरे जावे लागले होते. तो प्रकार मे मध्येही कायम आहे, असे गंगोपाध्याय म्हणाल्या. लॉकडाऊन झाल्यापासून महिला आयोगाकडे 70 तक्रारी दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना शहरी आणि ग्रामीण भागातून आल्या आहेत.
महिला आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारीमध्ये काही घटना कौंटुबिक हिंसाचाराच्या नव्याने घडल्या तर काही जून्या आहेत. लॉकडाऊन काळात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढल्याचे गंगोपाध्याय यांनी सांगितले. महिलांकडून तक्रारी फोन आणि व्हॉटसअॅपद्वारे मिळाल्या आहेत. महिला आयोग या तक्रारींचे निवारण सोमवारपासून करणार आहे.
कौंटुंबिक हिंसाचाराच्या घटनांची तक्रार काहीवेळा शेजारी करतात. महिला आयोग त्या तक्रारींची दखल घ्यायला गेल्यावर त्या महिला घडलेल्या प्रकाराबद्दल बोलायला घाबरतात. यामुळे आम्ही त्यांना काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करतो, असे लीना गंगोपाध्याय म्हणाल्या. ज्या महिला लॉकडाऊनमुळे आमच्याशी संपर्क करु शकत नाहीत त्यांनी लॉकडाऊननंतर संपर्क करावा असेही त्यांनी सांगितले.
महिला आयोगाला याकामामध्ये स्वयंम या संस्थेचे सहकार्य मिळत आहे. स्वयंम संस्थेच्या अनुराधा कपूर यांनी आम्हाला कौंटुंबिक हिसाचाराच्या घटनांबाबत फोन असल्याचे सांगितले. गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिलांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याचे सॅफो फॉर इक्वॅलिटी संस्थेंच्या प्रवक्त्याने सांगितले. आम्ही त्यांचे समुपदेशन करत आहोत असेही प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.