हैदराबाद- संपूर्ण जगाला कोविड19 म्हणजेच कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका बसला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू कोठे निर्माण झाला, कशापासून निर्माण झाला याबाबत अभ्यास आणि चर्चा सुरू आहेत. काहीजणांच्या मते कोरोना विषाणू वटवाघुळांपासून तयार झाला आहे. मात्र, हा दावा संशोधकांनी खोडून काढला आहे.
दक्षिण आशियायाई देशातील संशोधकांच्या समुहाने विशेषत: वटवाघूळ संवर्धानासाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा प्रसार वटवाघूळामुळे होत नाही, असा दावा केला आहे. वटवाघूळामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो हा गैरसमज आहे. हा चुकीचा प्रचार करण्यात आला आहे.
दक्षिण आशियायाई देशातील 64 संशोधक आणि वैज्ञानिक यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे वटवाघुळामुळे कोरोना प्रसार होत नाही, असे उस्मानिया विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनिवास यांनी सांगितले. गैरसमजूतीमधून नागरिकांनी वटवाघुळांना इजा पोहोचवण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भारतातील वटवाघुळांच्या 110 प्रजाती संकटात आल्या आहेत. गैरसमजातून केलेला प्रचार वटवाघुळांच्या जीवावर उठला आहे. शासनाने याची दखल घेतली योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी भारतीय वटवाघुळ संवर्धन ट्रस्टचे राजेश पुट्टस्वामियाह यांनी केली.
वटवाघुळे तांदुळ, मका, कापूस आणि तंबाखू या पिकांवरील किडे, किटक खातात यामुळे शेतकऱ्यांची पिके सुरक्षित राहतात. परिणामी मानवी अन्न किड्यांच्या प्रादुर्भावापासून वाचते त्यामुळे वटवाघुळे मारली जाऊ नयेत, अशी भावना संशोधकांची आहे.
वन्यजीवांच्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे कोरोना विषाणूचे संकट उभे राहिले असल्याचे अरिंजय बॅनर्जी यांनी सांगितले. ते कॅनडामध्ये संशोधन करत आहेत.