श्रीनगर : गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ४५ वर्षीय कौसर रियाझ आणि त्यांचा मुलगा अकीब हे गाडीतून आपल्या बेकरीकडे जात होते. तेव्हा त्यांना समोर सुरक्षा दलाचे जवान दिसले. मोठ्या प्रमाणात जवान दिसल्यामुळे कौसर यांनी मुलाला गाडी मागे वळवण्यास सांगितली. त्याने गाडी परत फिरवताच, मागून त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला ज्यातील एक गोळी कौसर यांना लागून त्यांचा मृत्यू झाला.
रक्तबंबाळ अवस्थेतील आपल्या आईला पाहून अकीबने गाडी थांबवली, तेव्हा कौसरच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी लागल्याचे त्याच्या लक्षात आले. "माझ्या आईला गोळी लागलेली पाहताच मी तेथील पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मात्र, त्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला कंट्रोल रुमकडे नेले, जिथे मी स्वतः माझ्या आईला उचलून गाडीतून बाहेर काढले. पोलिसांनी तिला कंट्रोल रुममध्ये आणल्यानंतर मृत घोषित केले. खरेतर, तिचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला होता." असे २५ वर्षांच्या अकीबने ईटीव्ही भारतला सांगितले.
कौसरचे कुटुंबीय या परिसरात एक बेकरी चालवतात. सकाळी लवकर पाव बनवण्यासाठी दररोज ते याच सुमारास बेकरीमध्ये जातात. अकीबचे ३१ ऑगस्टला लग्न झाले होते. त्यानंतर ते आपल्या नव्या घरातही शिफ्ट झाले होते. सलग दोन आनंददायी घटनांनंतर आता कौसरचे नातेवाईक पुन्हा एकदा त्यांच्या घरी जमा झाले आहेत; मात्र यावेळी कौसरच्या दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने...
दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या बाटमालू भागामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याच कौसरची ही कथा आहे. ही घटना घडली तेव्हा कौसरचे पती श्रीनगरच्या रुग्णालयात रात्रपाळीत काम करत होते. विशेष म्हणजे, घटनेला दोन दिवस उलटून गेले, तरी कौसरचा मृतदेह अजूनही पोलिसांनी कुटुंबीयांकडे सोपवला नाही. परिस्थिती तणावाची असल्याचे कारण पुढे करत पोलीस कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कौसरच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासोबतच, कौसरचा मृत्यू चकमकीमध्ये चुकून झाला नसून, त्यांना लक्ष्य करण्यात आले असल्याचा आरोपही कुटुंबाने केला आहे.
विशेष म्हणजे, असाच दावा बशीर अहमद खानच्या कुटुंबीयांनीही केला आहे. बशीर हे ६५ वर्षीय नागरिक होते. १ जुलैला एका दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. बशीर यांना गाडीतून बाहेर काढून मारण्यात आले होते, असा दावा त्यांचे कुटुंबीय करत आहेत. सुरक्षा दलांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
चकमकीत पोलिसच करतायत नागरिकांच्या घरातील रोकड लंपास..?
बाटमालू चकमकीवेळी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस ज्या घरांमध्ये शिरून तपास करत होते, त्यापैकी एक घर अब्दुल मजीद गानीचे होते. अब्दुल हे निवृत्त बँक मॅनेजर आहेत. "पोलीस अचानकपणे आमच्या घरात शिरले, आणि त्यांनी घरातील सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संपूर्ण घराची पडझड झाली आहे. शिवाय, घरातील लाखो रुपयांचे सोने आणि ४५ हजारांची रोकडही गायब झाली आहे" असे गानी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
"पोलिसांनी माझ्या तीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. इजहार उल इस्लाम हा बीयूएमएसमध्ये डॉक्टर आहे, इद्रीस उल इस्लाम हा दंतवैद्य आहे, तर, शाहीन उल इस्लाम याचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे." असेही अब्दुल यांनी सांगितले. गानी यांना दोन मुलीही आहेत, ज्यांपैकी एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
यापूर्वीही ज्या-ज्या परिसरांमध्ये पोलिसांनी अशा प्रकारची शोध मोहीम राबवली आहे, त्या भागांमधील नागरिकांनी आपल्या घरातील पैसे आणि सोने लंपास झाल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप पोलिसांनी अर्थातच फेटाळून लावले आहेत.
पोलीस आणि प्रशासनाची दडपशाही सुरूच..
कौसर यांच्याबाबत झालेल्या घटनेनंतर सकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात गोंधळ सुरू झाला होता. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येऊन कौसरच्या मृत्यूविरोधात निदर्शने करत होते. पोलिसांनी या आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला होता. या आंदोलनांच्या एक दिवस आधीच सोपोरे भागामध्येही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होते. इरफान अहमद या २३ वर्षीय तरुणाचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. ज्याच्या विरोधात ही आंदोलने सुरू होती. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवत परिसरातील इंटरनेट सेवाही बंद केली होती.
पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना इरफानच्या घरातून हँड ग्रेनेड मिळाले होते. त्यानंतर आणखी एका ठिकाणी असलेल्या शस्त्रसाठ्याची जागा दाखवण्यासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते ज्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचा मृतदेह हा सोपोरेच्या एका दगडाच्या खाणीत मिळाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दंडाधिकारी स्तरावरील चौकशीचे आदेश दिले आहेत.