लखनऊ - उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दलित तरुणीवर चौघांनी बलात्कार केला होता. गंभीर जखमाी झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या तरुणीचा शवनिच्छेदनाचा अहवाल आला आहे. तिच्या शरिरावर गंभीर जखमा असून तिला विष देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. तरुणीवर बलात्कार झाल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे.
हात, पाय आणि शरिराच्या इतर भागांवर तिला जखमा करण्यात आल्या होत्या. यकृत आणि पोटाला गंभीर जखमा झाल्याने शरिरांतर्गत रक्तस्त्राव झाला होता. त्यातच तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
२९ सप्टेंबरला महाविद्यालयात बी कॉमच्या तिसऱ्या वर्षाला प्रवेश घेवून तरुणी माघारी येत असताना चौघांनी तिचे अपहरण केले होते. या तरुणीवर चौघांनी जीवघेणा हल्ला केला, तसेच बलात्कराही केला. युवतीची गंभीर स्थिती पाहून हल्लेखोरांनी तिला रिक्षामध्ये आणून तिच्या घराजवळ सोडले होते. कुटुंबीयांनी तरुणीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरिरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.
हाथरस आणि बलरामपूर घटनांनी उत्तर प्रदेश राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले असून पीडित तरुणींना न्याय देण्याची मागणी होत आहे.