अहमदाबाद(गुजरात)- अयोध्या येथील राम मंदिराची उंची 20 फुटांनी वाढवण्यात आली आहे. मूळ आराखड्यात दोन सभांमंडप देखील वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती निखील सोमपुरा यांनी दिली. निखील हे राम मंदिराचे मुख्य आरेखक सी.सोमपुरा यांचे चिरंजीव आहेत.
1988 साली बनवलेल्या आराखड्यात मंदिराची उंची 141 फूट ठेवण्यात आली होती. त्या आराखड्याला 30 वर्षे होऊन गेलीत. राम मंदिराबाबत लोकांच्यामध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे आम्ही 20 फूट उंची वाढवणे आणि दोन सभांमंडप वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे निखील सोमपुरा यांनी सांगितले.
राम मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. राम मंदिराचा आराखडा बनवण्याची संधी मिळणे आमच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद आहे. जुन्या आराखड्याप्रमाणे तयार करण्यात आलेले दगडही वापरले जातील, असेही सोमपुरा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर मंदिराचे काम पूर्ण होण्यास तीन ते साडे तीन वर्ष लागतील, असा अंदाज सोमपुरा यांनी व्यक्त केला.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ऑगस्टमध्ये भूमीपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमीपूजन झाल्यानंतर एल अँड टी कंपनीकडून पायाभरणीच्या कामाला सुरुवात होईल, असे निखील सोमपुरा यांनी सांगितले.