नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगोई उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना भेटणार आहेत. अयोध्या वादग्रस्त जमीन निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाविषयी माहिती घेण्यासाठी आणि त्यावर चर्चेसाठी ही भेट होणार आहे.
सरन्यायाधीश गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी आणि पोलीस महासंचालक ओम प्रकाश सिंग यांना आपली घेण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल रात्री राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हा मॅजस्ट्रेट यांच्याशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेऊन प्रत्येक जिल्ह्याला सामान्य वातावरण राहण्यासाठी आवश्यक सूचना दिल्याचे परिपत्रकाद्वारे नंतर कळवण्यात आले.
राज्यासाठी लखनऊ येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष असेल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱया प्रत्येकाविरोधात कडक कारवाई केली जावी, असे आदेश आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद वादग्रस्त जमिनीविषयीचा निर्णय राखून ठेवत असल्याचे न्यायालयाने १६ ऑक्टोबरला म्हटले होते. सलग ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर आता या विवाद प्रकरणात निर्णय येणार आहे. १७ नोव्हेंबरला म्हणजेच सरन्यायाधीश गोगोई यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.