लखनऊ - अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम करताना पायाखाली काल पत्र म्हणजेच टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचे राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र संस्थानाने सांगितले आहे. राम मंदिराच्या जागी दोनशे फूट खाली ही टाईम कॅप्लूस ठेवण्यात येणार आहे. राम मंदिराच्या इतिहासाचा भविष्यात कोणाला अभ्यास करायचा असल्यास याचा उपयोग होईल, असे जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य कमलेश्वर चौपाल यांनी सांगितले. तसेच भविष्यात जागेचा कोणताही वाद उद्भवणार नसल्याचे बोलले जात आहे.
'राम मंदिर बांधकाम जागेवर जमिनीत दोनशे फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे. त्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांना राम जन्मभूमीचा अभ्यास करता येणार आहे, असे चौपाल म्हणाले. कमलेश्वर चौपाल हे बिहारमधील बहुजन समाजातील असून 9 नोव्हेंबर 1989 साली त्यांनी अयोध्येत पहिल्यांदा राम मंदिराचा पाया रचला होता. तेव्हापासून 64 वर्षीय चौपाल राम मंदिराच्या बांधकामाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या टाईम कॅप्सूलवर राम मंदिरासंबंधीची सर्व माहिती असणार आहे. त्यामुळे भविष्यात जागेबाबत वाद उद्भवू नये, हा या मागील हेतू आहे. मंदिराबाबतची माहिती बांधकामाखाली टाईम कॅप्सूलवर लिहून ठेवण्यात येणार आहे. मंदिराची निर्माण तारीख आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती त्यावर असणार आहे. बाबरी मशिद आणि रामजन्मभूमीवरून अनेक शतके वाद चालला. भविष्यात असा वाद होऊ नये, म्हणून टाईम कॅप्सूल खाली ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशिद आणि रामजन्मभूमी वादावर निकाल देऊन आता 9 महिने पूर्ण होत आले आहेत. मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मागील वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने या विवादावर निकाल दिला होता.
राम मंदिराला विवादित जागा देत मशिदीसाठी दुसरीकडे पाच एकर जमीन सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यानुसार उत्तर प्रदेशात मोक्याच्या ठिकाणी सुन्नी वक्क्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यात आली आहे. मंदिराच्या भूमीपूजनादिवशी 40 किलोची चांदीची वीट पायात ठेवण्यात येणार आहे. याचे जोरदार काम सुरू आहे. 3 ऑगस्टपासूनच पूजापाठ सुरु करण्यात येणार आहे. येथील संपूर्ण परिसर भूमी पूजनाच्या निमित्ताने सजविण्यात आला आहे.