चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चेन्नई आयआयटीमधील पदवीदान समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचे प्रक्षेपण दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकांनी रोखले. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आर. वसुमथी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
![Assistant director of Doordarshan suspended](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/pm-modi-iit_0210newsroom_1570035089_317.jpg)
चेन्नई येथील आयआयटीमध्ये दोन दिवसीय पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. त्यांचे भाषण सुरु झाल्याच्या थोड्याच अवधीत, 'डीडी पोडीगई' या दूरदर्शन केंद्रातून मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण होत नसल्याचे लक्षात आले. त्यादृष्टीने चौकशी केली असता, तेथील सहाय्यक संचालक आर. वसुमथी यांनी हे प्रक्षेपण रोखल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शंकर यांनी ही कारवाई केली. आर. वसुमथी हे सध्या दूरदर्शन कार्यालयाच्या जागेत राहत आहेत. वेळ आल्यास त्यांना राहते घरदेखील सोडावे लागणार आहे. दरम्यान, प्रसार भारतीकडून निलंबनाचे कारण हे शिस्तभंग सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : 'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'