दिसपूर - आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात सध्या भारतातील सर्वात मोठे डिटेंशन कॅम्प उभारले जात आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी डिटेंशन कॅम्पचा वापर होतो. या कॅम्पचे काम हे डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गुवाहाटीपासून १५० किलोमीटर दूर हे केंद्र उभारले जात आहे. भारताच्या गृहमंत्रालयाने या केंद्रासाठी, गेल्या वर्षी जूनमध्ये ४६.५ कोटींचा निधी दिला होता. हे केंद्र एकूण अडीच हेक्टर परिसरात पसरले आहे.
फुटबॉलच्या सात मैदानांइतक्या मोठ्या या केंद्रात, कमीत कमी तीन हजार लोक मावतील असा अंदाज आहे. या केंद्रामध्ये एक मोठे सभागृह. १८० शौचालये, १५ तीन मजली इमारती, शाळा आणि रूग्णालयाचा देखील समावेश असेल.
हेही वाचा : उत्तर प्रदेशातही 'एनआरसी' लागू होणार
या केंद्राची उभारणी करणाऱ्या काही कामगारांनी सांगितले, की त्यांचे नावही आसामच्या एनआरसी यादीमध्ये सामाविष्ट नव्हते. त्यामुळे आता, ज्यांनी हे केंद्र बांधले, त्यातील काही कामगारांवर पुढे तिथेच राहण्याची वेळ येऊ शकते.
सध्या कोक्राझार, गोलपाडा, जोरहात, तेजपूर, दिबर्गा आणि सिलचर जिल्ह्यांतील तुरुंगांमध्ये उभारलेल्या सहा तात्पुरत्या डिटेंशन केंद्रांमध्ये मिळून १,१३६ लोक राहत आहेत. गेल्याच महिन्यात नजरकैदेत ३ वर्षे राहिलेल्या नऊ लोकांना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जामीनावर सोडण्यात आले. आतापर्यंत डिटेंशनमध्ये असलेले २५ लोक आरोग्याच्या कारणांमुळे मृत पावले आहेत.
३१ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या, आसाम राज्याच्या राष्ट्रीय नागरिकत्व यादीमधून साधारणपणे १.९ दशलक्ष लोक वगळले गेले होते. या वगळल्या गेलेल्या लोकांना आपण भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी १२० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त परदेशी न्यायाधिकरणेही सुरु केली गेली आहेत.
हेही वाचा : एनआरसी १९४८-२०१९ : जाणून घ्या राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीविषयी...