गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सोमवार पर्यंत राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ३.१८ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यासोबतच, सोमवारी नागाव जिल्ह्यातील राहा भागामध्ये एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. यानंतर आतापर्यंत यावर्षीच्या पुरामध्ये बळी गेलेल्यांची संख्या ११९वर पोहोचली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत माहिती दिली.
आतापर्यंत राज्यातील धेमाजी, लख्मीपूर, बिसवनाथ, कामरुप, मोरिगाव, होजाई, नागाव, माजुली, जोरहाट, सिवसागर, दिब्रुगढ, तिनसुकिया आणि पश्चिम कर्बी अँगलॉंग हे जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. यातील नागावमधील परिस्थिती सर्वात बिकट आहे. या जिल्हातील १.९९ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ मोरिगाव (३६,४०० लोक) आणि कामरुप (२५,१००) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
आतापर्यंत सुमारे ३८९ गावं आणि १३,४६३ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून चार जिल्ह्यांमध्ये १३ मदत आणि वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये ११७ लोकांनी निवारा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जोरहाट, तेजपूर आणि सोनितपूर जिल्ह्यांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
हेही वाचा : वडोदऱ्यात तीन मजली इमारत कोसळली; 3 मजूर ठार, तर 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती